वैवाहिक संघर्ष आणि समुपदेशन – Marital Conflicts & Counselling

वैवाहिक संघर्ष आणि समुपदेशन – Marital Conflicts & Counselling

दोन भिन्न विचारांच्या भिन्न कुटुंबात वाढलेल्या व्यक्ती विवाहानंतर पती-पत्नी बनून एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात मतभिन्नता असणे साहजिकच आहे. दोघांची आवड-निवड, स्वभाव, जडणघडण, संस्कार यांच्यातही तफावत असणे शक्य आहे. विवाहापूर्वी त्यांच्या मनात जोडीदाराबद्दल काही स्वप्नवत अपेक्षा असतात. चित्रपट, कथा-कादंबर्‍या यातून भेटणार्‍या नायक-नायिकांमध्ये ते आपल्या भावी जोडीदाराचे प्रतिबिंब पाहत असतात. प्रेम, शृंगार, समागम याबद्दल त्यांच्या अपेक्षा उच्चकोटीतील असतात. विवाहानंतर त्यांना कमी अधिक प्रमाणात अपेक्षाभंगाला सामोरे जावे लागते. त्यातून नैराश्य आल्याने त्यांची चिडचिड वाढते. त्यामुळे वैवाहिक संघर्ष निर्माण होतो.

संसार म्हटले की, भांड्याला भांडे लागणार असे समजून वडिलधार्‍या मंडळींकडून नवदाम्पत्यांच्या वैवाहिक संघर्षाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे पती-पत्नीतील वैवाहिक संघर्ष अधिकच वाढीस लागतात. प्रेमविवाहामध्ये बर्‍याच वेळा प्रेम आंधळे असते याचा प्रत्यय विवाहानंतर येतो. त्यांच्यात किरकोळ गोष्टींवरूनही खटके उडायला लागतात. प्रेमविवाहानंतर बर्‍याच वेळा नवीन घरोबा केला जातो. अशा वेळी पती-पत्नींमध्ये संघर्ष उद्भवल्यास वडिलधार्‍या व्यक्तींचे मार्गदर्शन मिळू शकत नाही. त्यामुळे पती-पत्नींच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. शेवटी त्यांच्यामध्ये घटस्फोट घेण्याची मानसिक तयारी होते. त्यामुळे बरेचसे प्रेमविवाह अयशस्वी ठरतात.

प्रेमविवाहाबरोबरच पारंपारिक पध्दतीने झालेल्या विवाहामध्याही पती-पत्नींमध्ये संघर्ष निर्माण होतो. पूर्वीच्या काळी स्त्रीची भूमिका चूल आणि मूल एवढ्यापुरतीच मर्यादित असायची. आजकाल स्त्रीमुक्तीचे वारे वाहू लागले आहे. आजची स्त्री घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडली आहे. स्त्रिया देखील पुरूषांच्या खांद्याला खांदा भिडवून नोकरी-व्यवसाय करू लागल्या आहेत. स्त्रियांना अधिक स्वातंत्र्य मिळू लागल्याने वैवाहिक संघर्षाचे प्रमाण वाढले आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल, स्त्री घरकाम करून नोकरीही करते ही गोष्ट पुरूषांनी ध्यानात घ्यायला हवी.

पती-पत्नींचे स्वभावदोष बर्‍याच वेळा वैवाहिक संघर्षाला कारणीभूत ठरतात. वेगवेगळे स्वभाव असलेल्या व्यक्ती पती-पत्नी म्हणून यशस्वी संसार करतात परंतु स्वभावदोष संघर्षाची ठिणगी उडवायला कारणीभूत ठरतात. जोडीदाराचा संशयी स्वभाव बर्‍याच वेळा वाद उत्पन्न करतो. विनाकारण जोडीदाराबद्दल संशय व्यक्त केल्यास जोडीदार दुखावला जातो. बर्‍याच वेळा हा संशय जोडीदाराच्या चारित्र्याबद्दलचा असतो. जोडीदाराने संशय व्यक्त केल्यानंतर भांडणाला तोंड फुटते. त्यामुळे वैवाहिक संघर्ष वाढीस लागतो.

जोडीदाराचा शीघ्रकोपीपणा हा देखील वैवाहिक संघर्षास कारणीभूत ठरतो. किरकोळ कारणांवरूनही चिडचिड करणारा, रागावणारा जोडीदार असल्यास पती-पत्नींचे संबंध बिघडतात. त्याला जोडीदाराबद्दल प्रेम, आपुलकी न वाटता तिरस्कार वाटू लागतो. काही वेळा रागीट स्वभावाचा पती पत्नीस मारहाणही करतो. ही मारहाण सतत होत राहिल्यास स्त्रीचाही संयम सुटतो. त्यामुळे पती-पत्नींचे नातेसंबंध संपुष्टात येतात.

काही स्त्रियांमध्ये अतिशय काटेकोरपणा आढळून येतो. त्यांना घरामध्ये थोडीशीही अस्वच्छता खपत नाही. त्यामुळे अशा स्त्रियांचे इतरांशी खटके उडू लागतात. बर्‍याचशा घरांमध्ये सासू-सुनांमध्ये संघर्ष आढळून येतो. अशा वेळी पत्नी आणि आई यांच्या भांडणात कोणाची बाजू घ्यावी याबद्दल पुरूषांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. दोघींपैकी एकीची बाजू घेतल्यास दुसरीचा रोष पत्करावा लागतो. बर्‍याचवेळा लग्नातील मानपानही वैवाहिक संघर्षाचे कारण ठरते. या कारणावरून विवाहितेचा पतीबरोबरच इतरांकडूनही छळ केला जातो.

विवाहानंतर बर्‍याच तरूणी स्वतंत्रपणे संसार करावा या विचाराच्या असतात. एकत्र कुटुंबात त्यांची राहावयाची तयारी नसते. अशा वेळी वेगळे राहण्यासाठी त्यांच्याकडून पतीवर दबाव आणला जातो. त्यासाठी प्रसंगी माहेरची मदत घेतली जाते. परंतु आर्थिक कारणांमुळे कांही पुरूषांना स्वतंत्र संसार थाटणे शक्य होत नाही. त्यामुळे वेगळे राहण्याच्या विषयावरून पती-पत्नींमध्ये खटके उडू लागतात. वेगळे राहाण्याच्या विषयामुळे वैवाहिक संघर्ष अधिकच वाढू लागतो.

व्यक्तीमत्व दोष सौम्य स्वरूपाचे असतील तर ते दूर करणे शक्य असते. परंतु व्यक्तिमत्त्व दोष खूप गंभीर व तीव्र स्वरूपाचे असतील तर विवाह टिकविणे अशक्य बनते. बर्‍याच वेळा तडजोड म्हणून संसार सुरू ठेवल्यास जोडीदारास खूपच मन:स्ताप सहन करावा लागतो. अशा वेळी रितसर घटस्फोट घेणे, हेच शहाणपणाचे ठरते.

मुलांना कुठल्या शाळेत किंवा क्लासमध्ये घालावे, त्यांचे लाड किती करावे, त्यांना शिस्त कशी लावावी याबद्दल पती-पत्नींमध्ये मतभेद असतात. हे मतभेद काहीवेळा पती-पत्नींमध्ये कलह निर्माण करतात. पती-पत्नींच्या भांडणाला वयाची मर्यादा नसते. नवविवाहीत दाम्पत्यांपासून वृध्द आजी-आजोबांपर्यंत सर्व जोडप्यांमध्ये वाद निर्माण होत असतात. भांडणामुळे दोघांना एकमेकांबद्दल तिरस्कार वाटू लागतो. वाद निर्माण होऊ नये यासाठी दोघांनी एकमेकांचा स्वभाव जाणून घेऊन तडजोड करणे आवश्यक ठरते.

पती-पत्नींनी संघर्ष टाळण्यासाठी आपली मते स्पष्टपणे व्यक्त करायला हवीत. स्पष्टवक्तेपणामुळे गैरसमज टाळले जाऊन संघर्षाची धार बोथट होते. आपले मत स्पष्टपणे व्यक्त करताना जोडीदाराच्या भावनांचा विचार करणे आवश्यक ठरते. महत्त्वाच्या गोष्टींबद्दल निर्णय घेताना पती-पत्नींनी एकमेकांशी सल्लामसलत करणे आवश्यक असते. पतीच्या आर्थिक व्यवहारासंबंधी सर्व माहिती पत्नीस देणे पतीचे कर्तव्य आहे. वैवाहिक संघर्ष टाळण्यासाठी दोघांनीही तडजोड करणे आवश्यक ठरते. चूक झाल्यास चुकीबद्दल जोडीदाराची क्षमा मागणे कमीपणाचे मानू नये.

लैंगिक समस्या हे देखील वैवाहिक संघर्षाचे एक कारण असल्याचे आढळून येते. लैंगिक समस्या उद्भवण्यास बर्‍याच वेळा लैंगिक अज्ञान कारणीभूत ठरते. बर्‍याचशा नवदाम्पत्यांना लैंगिकतेची शास्त्रीय माहिती नसते. त्यामुळे लैंगिक संबंधापूर्वी दोघांच्याही मनावर दडपण, भीती व चिंता जाणवते. लैंगिक संबंधामध्ये पती-पत्नींकडून परस्परांच्या भावनांचा विचार केला जात नाही. वैवाहिक सौख्यासाठी पती-पत्नींमध्ये निकोप लैंगिक संबंध असणे आवश्यक आहे. लैंगिक समस्यांमुळे लैंगिक संबंधामध्ये बाधा उत्पन्न होऊन वैवाहिक संघर्ष उद्भवतो.

पुरूषांना प्रत्यक्ष लैंगिक संबंधामध्ये अधिक रस असतो तर स्त्रियांना प्रणयक्रिडेची अधिक आवड असते. प्रत्येक स्त्री पुरूषाची लैंगिक अभिरूची कमी अधिक असल्याचे आढळून येते. शहरी वातावरणात नवदाम्पत्यांना कामक्रीडेसाठी पुरेसा एकांत मिळू शकत नाही. त्यामुळे घाईगडबड होते. मुले झाल्यानंतर पतीपत्नींना लैंगिक संबंध ठेवण्यासाठी अधिकच मर्यादा येते. त्यामुळे पती-पत्नींना लैंगिक सुखापासून वंचित रहावे लागते.

काही स्त्रियांना लैंगिक संबंधाबद्दल तिरस्कार वाटतो. उतारवयात हा तिरस्कार अधिक प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे पतीकडून झालेली लैंगिक सुखाची मागणी पत्नीकडून नाकारली जाते. त्यामुळे पती-पत्नींमध्ये वादावादी होते. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता वाढते. पती-पत्नींनी लैंगिक समस्या दूर करण्यासाठी योग्य वेळीच लैंगिक समस्यातज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक असते. योग्य वेळी लैंगिक समस्यांचे निराकरण झाल्यास वैवाहिक संघर्ष टाळणे शक्य होते.

पती-पत्नींचे विवाहबाह्य संबंध असतील तर त्यांच्यात संघर्ष उद्भवतो. काही वेळा वैवाहिक संघर्षामुळेही स्त्री-पुरूष विवाहबाह्य संबंधाकडे वळतात. पती-पत्नींच्या नात्यामध्ये आपुलकी नसेल तर लैंगिक संबंध दोघांनाही नकोसे वाटतात. काही वेळी पती पत्नींकडून लैंगिक संबंध हे यांत्रिकपणे उरकले जातात. अशा लैंगिक संबंधामध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असत नाही. त्यामुळे लैंगिक संबंध होऊनही पती-पत्नी मानसिकदृष्ट्या अतृप्तच राहतात. अशा वेळी विवाहबाह्य संबंध ठेवण्याची मानसिकता निर्माण होते. नंतर असे विवाहबाह्य संबंधच कौटुंबिक अस्वास्थ्याचे कारण ठरतात.

वैवाहिक संघर्ष वाढत चालला की पती-पत्नींचे नातेसंबंध दुरावू लागतात. काहीवेळा पती-पत्नी एकत्र राहत असले तरी त्यांच्यात दुरावा निर्माण झालेला असतो. एक तडजोड म्हणून ते पती-पत्नीची भूमिका पार पाडत असतात. एकत्र राहूनही फार न बोलणे किंवा अबोला धरणे असे प्रकार पती-पत्नींकडून घडतात. त्यामुळे संबंध अधिकच ताणले जाऊन काही वेळा पती-पत्नी विभक्त होतात. विभक्त होताना ते एकमेकांच्या संमतीने विभक्त होतात किंवा एकजण दुसर्‍या व्यक्तीच्या संमतीशिवाय तिला सोडून जातो. पती-पत्नी विभक्त झाल्यानंतर त्यांच्यामध्ये नैराश्य निर्माण होते. अशा वेळी त्वरीत त्यांच्यात समेट घडवून आणणे आवश्यक असते. वैवाहिक संघर्षाचे निराकरण करण्याचा तडजोड हा उत्तम मार्ग असला तरी तो योग्य पध्दतीने वापरला जाणे आवश्यक असते. एकदा कोर्टाची पायरी चढल्यानंतर पती-पत्नींमध्ये तडजोड घडवून आणणे अशक्य असते. त्यामुळे पती-पत्नींनी वैवाहिक संघर्ष टाळण्यासाठी, नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी योग्य वेळीच विवाह समुपदेशकाचे (Marriage Counselor) मार्गदर्शन घेणे आवश्यक ठरते.

पती-पत्नींमधील संघर्ष वाढत गेल्यास त्यांच्यातील वैवाहिक संबंध दुरावतात. संबंध दुरावलेले पती पत्नी एकत्र राहतात किंवा एकमेकांपासून विभक्त होतात. एकत्र राहिलेले पतीपत्नी एकमेकांशी अगदी तटस्थपणे वागतात त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा स्नेहभाव आढळून येत नाही. विभक्त होताना ते एकमेकांच्या संमतीने विभक्त होतात किंवा काहीवेळा पती पत्नीला तिच्या संमतीशिवाय सोडून जातो. वैवाहिक संघर्षामुळे संबंध दुरावल्याने काही वेळा पती पत्नी मनोविकारांना बळी पडतात.

पती पत्नींमधील समझोता मुख्यत्वे तीन प्रकारे घडून येतो. पहिल्या प्रकारात संघर्षाने उत्पन्न होणार्‍या मानसिक त्रासामुळे दोघांचेही मन विरघळते. त्यामुळे दोघेही वादाच्या मुद्याचे निराकरण करून पुनश्‍च संबंध प्रस्थापित करतात. या प्रकारचा समझोता कमी कालावधीतच घडून येतो. दुसर्‍या प्रकारच्या समझोत्यात पती पत्नींपैकी एक व्यक्ती समझोत्यासाठी पुढाकार घेते. परंतु दुसरी व्यक्ती तिला मानसिक त्रास देण्यासाठी ती झिडकारते त्यामुळे समझोत्यास प्रथम उद्युक्त झालेल्या व्यक्तीचा हिरमोड होतो व ती दुसर्‍या बाजूने समझोत्याचा प्रस्ताव आल्यास आपल्याला मिळालेल्या नकाराचा बदला म्हणून समझोत्याची मागणी फेटाळून लावते. अशारितीने समझोत्याची मागणी एकदा पतीकडून व एकदा पत्नीकडून करण्यात येऊन कालांतराने त्यांच्यात समझोता घडून येतो. तिसर्‍या प्रकारच्या समझोत्यात समझोत्याची मागणी नेहमी एकाच व्यक्तीकडून करण्यात येते. दुसरी व्यक्ती ती मागणी अनेकवेळा फेटाळून लावते व काही कालावधीनंतर समझोत्यास तयार होते.

काही वेळा लहानसहान कारणांवरूनही पतीपत्नींमध्ये संघर्ष उद्भवतो. वैवाहिक जीवनात थोडाफार संघर्ष असणे ही आवश्यक बाब आहे. परंतु संघर्ष निर्माण झाल्यास समझोत्यासाठी दोघांनीही प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. संघर्ष निर्माण झाल्यास पतीपत्नींनी दीर्घकाळ अबोला धरू नये. तसेच अबोला धरून एकमेकांशी संवाद साधण्यासाठी मुलांना मध्यस्थ बनवू नये. वादविवाद, आदळआपट व मारहाण करणे या गोष्टी टाळावयास हव्यात. भांडणानंतर पत्नीने रागाने माहेरी जाणे टाळावयास हवे. शक्य तितक्या लवकर संघर्ष मिटविण्यासाठी प्रयत्न करावा. मनाचा मोठेपणा दाखवून जीवनसाथीच्या हातून घडलेल्या चुका माफ करावयास हव्यात.

जीवनसाथी आपल्यासारखाच असावा, त्याच्या आवडीनिवडी, स्वभाव आपल्यासारख्याच असाव्यात व त्या व्यतिरिक्त असल्यास चुकीचे समजणे हे संघर्षास कारण ठरते. विवाहीतांनी आपली जीवनसाथीची निवड चुकली असे समजून निराश होऊ नये. आदर्श पती पत्नी हे केवळ कथा-कादंबर्‍यात किंवा सिनेमातच भेटतात, हे ध्यानात ठेवावे. जीवनसाथीच्या आवडीनिवडीमध्ये रूची दाखविणे आवश्यक असते. तसेच एकमेकांच्या सुखदु:खात सोबत असल्याची जाणीव करून देणे महत्त्वाचे असते. पतीपत्नींनी शारिरिक व भावनिक पातळ्यांवर एकत्र येण्याचा प्रयत्न करून ती अनुरूपता टिकवण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही कठिण परिस्थितीत वैवाहिक जीवन सुखी करण्याची जिद्द बाळगून पतीपत्नींनी त्यासाठी प्रयत्न करणे हीच खरी वैवाहिक जीवनाची गुरूकिल्ली आहे.